Monday, April 8, 2019

दिव्यांग मतदारांना मतदानासाठी सोईसुविधा उपलब्ध

वृ.क्र  194
12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघ

दिव्यांग मतदारांना मतदानासाठी सोईसुविधा उपलब्ध

                         गडचिरोली दि 8:-  12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल रोजी  मतदान होत आहे. मतदानासाठी मतदारांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिव्यांग व्यक्तींना मतदान प्रक्रिया सहजसुलभ व्हावी, त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग मोठ्या संख्येने वाढावा. याकरीता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
                             लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019मध्ये दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढावा यासाठी आयोगाकडून विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील- 16 शाळा, गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील-64 शाळा, व अहेरी विधानसभा क्षेत्रातील -62 शाळा अशा एकूण 142 ठिकाणी रॅम्प तयार करण्यात आलेले आहेत.  जिल्ह्यात एकूण 814 मतदानकेंद्रावर रॅम्प ची सुविधा उपलब्ध आहे. 164 पोलिस स्टेशनमध्ये आरमोरी-114, गडचिरोली-104, अहेरी-133 असे एकूण अल्पदृष्टी-351, मुकबधिर -308, शारिरीक अपंग-1365, इतर 172 असे एकूण 2196 दिव्यांग मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. शारिरीक दिव्यांगासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्र- 134, आरमोरी विधानसभा क्षेत्र-49, अहेरी विधानसभा क्षेत्र-133 असे एकूण 316 व्हिलचेअर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याशिवाय दिव्यांगाना सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात येत आहे.  अंध मतदारांना ब्रेल लिपीच्या सहाय्याने मतदान  करता येणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय इत्यादी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
         भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग व्यक्तिंचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी पीडब्लूडी  ॲप (PWD App) तयार केले आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी काही मदतीची आवश्यकता असल्यास दिव्यांग व्यक्ति पीडब्लूडी ॲप मोबाईल वर डाऊन लोड करुन या ॲपद्वारे ते मदतीचे स्वरुप नोंदवू शकतात. तसेच 1950 किंवा 1800111950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क  साधू शकतात. त्यानंतर त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्हिलचेअर अथवा वाहनाची सोय करुन देण्यात येईल. मतदान केंद्रावर सहाय्यकाची आवश्यकता भासणार असल्यास तशी व्यवस्था आहे. मतदान केंद्रावर रॅम्प, पिण्याचे पाणी, सावलीचे पेंडाल, मदत कक्ष इत्यादीव्यवस्थेसह दिव्यांग मतदारांना मतदानाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
-----000-----

No comments:

Post a Comment

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल