गडचिरोली, दि. 9 : लोकसभा निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
भरारी पथके, स्थिर निगराणी पथके, पोलीस स्टेशन व क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत रोख रक्कम, अवैध दारू, अमली पदार्थ व शस्त्रास्त्र व मतदारांना प्रलोभन म्हणून वाटप करण्यात येणाऱ्या वस्तू यावर बारकाईने नजर ठेवण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. मतदानासाठी लाच देणे, धमकावणे, भीती दाखविणे अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगणे, व सामाजिक शांततेचा भंग करणे हा केवळ निवडणूकविषयक गुन्हा नसून त्याबाबत भारतीय दंड संहितेनुसार शिक्षेस पात्र आहे. शासकीय यंत्रणेकडील ध्वनिपेक्षक ( लाऊडस्पीकर ) यंत्राव्यतिरिक्त कोणतेही ध्वनिपेक्षक यंत्र सुरु राहणार नाही असे ध्वनिपेक्षक यंत्र आढळून आल्यास संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. आवश्यक त्या सर्व ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली असून पोलिसांमार्फत गस्त सुरु राहणार आहे . सर्व मतदारांनी मतदानाचे कर्तव्य बजावावे व लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ची प्रक्रिया शांततेने पार पाडण्यास प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
-----000-----
|
No comments:
Post a Comment