आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
'सी व्हिजील' ठरणार उपयुक्त
गडचिरोली,दि.01: लोकसभा निवडणूक 2019 दरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीचा आढावा घेण्यासाठी तसेच त्रुटी दूर करण्यासाठी "सी व्हिजील "ॲपची निर्मिती भारतीय निवडणूक आयोगाने केली आहे. पुर्वी आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीची सत्यता तपासून त्यावर कारवाई करताना यंत्रणेची दमछाक होत असे. तसेच सबळ पुराव्या अभावी संबंधितावर कारवाई करताना मर्यादा येत असत. या नवीन ॲपमुळे या त्रुटी आणि मर्यादा कमी होणार आहेत.
" सी व्हिजील " हे ॲप निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनासंदर्भात तक्रार करणाऱ्या नागरिकासाठी एक नाविन्यपुर्ण अस्त्र ठरणार आहे.या माध्यमातून नागरिक स्वतंत्र व नि:पक्षपाती निवडणुकांच्या संचलनासाठी सक्रिय आणि जबाबदार भुमिका बजावू शकतात. हे ॲप युजर फ्रेंडली असून ॲपचा वापर निवडणुकांच्या अधिसूचनांच्या तारखेपासून मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. यातील प्रमुख वैशिष्टये म्हणजे तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हिडिओ पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. कॅमेरा, चांगले इंटरनेट कनेक्शन आणि जिपीएस प्रवेशासह सज्ज असलेल्या कोणत्याही अँड्राईड स्मार्टफोन वरुन या ॲपच्या माध्यमातून आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार करता येऊ शकते.
तीन टप्प्यात होणार तक्रार निवारण
आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे वाटत असल्यास नागरिकांनी त्या घटनेचे एक छायाचित्र अथवा दोन तीन मिनिटांचे व्हिडीओ रेकाँर्डिंग करावे. भौगोलिक माहिती प्रणालीव्दारे (जीपीएस) स्वयंचलीत स्थान मॅपींगसह फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करावा. नंतर त्या तक्रारदार नागरिकांच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होतो. नागरिक अशा प्रकारे अनेक घटना नोंदवू शकतात. प्रत्येक अहवालासाठी एक आयडी मिळवू शकतात. " सी व्हिजील" व्दारे आपली ओळख लपऊन सुध्दा तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे. यामध्ये मोबाईल क्रमांक आणि इतर प्रोफाईल तपशिल या प्रणालीवर पाठवले जात नाही. त्यामुळे निनावी तक्रारीबाबत तक्रारकर्त्यास पुढील स्थिती, संदेश मिळणार नाहीत. मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई होणार आहे. नागरिकांनी तक्रार नोंदवल्यानंतर ती अवघ्या पाच मिनिटातच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होईल. त्या माहितीच्या आधारे तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एस.एस.टी, व्हि.एस.टी. आणि भरारी पथकाकडे ती माहिती पाठवण्यात येईल. त्यानुसार संबंधित पथकाकडे ती माहिती पाठविण्यात येईल. त्यानुसार संबंधित पथकाकडे असणाऱ्या जीव्हीआयजीआयएल अन्वेषक नामक जीआयएस आधारित मोबाईल ॲप्लीकेशनच्या सहाय्याने जीआयएस संकेत आणि नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन संबंधित पथक घटनास्थळावर अवघ्या 15 मिनिटाच्या आत पेाहचणे अपेक्षित आहे.
संबंधित तक्रारीबाबत प्राथमिक तपास आणि तक्रारीतील तथ्यांची तपासणी करुन त्यासंबंधीचा अहवाल ॲपव्दारेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तातडीने पाठविला जाईल. हा कालावधी 30 मिनिटापेक्षा अधिक नसेल. त्या तक्रारीत तथ्य आढळले तर भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर माहिती पाठविण्यात येईल. तक्रार अपलोड केल्यापासून अवघ्या 100 मिनिटाच्या आत तक्रारीची स्थिती तक्रारकत्याला प्राप्त होईल. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर तसा संदेश पाठवला जाईल.
No comments:
Post a Comment